दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरु झाला असून लवकरच तालुका,जिल्हा तसेच राज्यस्तरावर या विभागाचा विस्तार होईल.दिव्यांगांच्या प्रचलित कालबाह्य योजना सुधारण्याबरोबरच नवीन योजनांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.मी सेवानिवृत्त झालो तरी आगामी काळात दिव्यांग विकासाकरिता कार्य करणार असल्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले.पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सल्ला व मार्गदर्शन कक्षाच्या वतीने आयोजित दिव्यांग जागृती कट्टा या ऑनलाईन चर्चासत्रात ओमप्रकाश देशमुख बोलत होते.
यावेळी दिव्यांग कल्याण उपायुक्त संजय कदम, कामायणी उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कालिदास सुपाते, नगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक डॉ. दिपक अनाप, प्रहार संघटनेचे अभय पवार, पुणे जिल्हा पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कन्हेकर, समुपदेशक हरिदास शिंदे, समन्वयक अशोक सोळंके, रमेश मुसूडगे यांचेसह दिव्यांग आयुक्तालयातील अधिकारी, राज्यातील अनेक जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी,वैसाका,सहाय्यक सल्लागार, दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्था-संघटना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या सल्ला व मार्गदर्शन कक्षाच्या वतीने मागील वर्षभर दरमहा दिव्यांग कल्याणाविषयी दिव्यांग जागृती कट्टा हा ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले जाते.जुलै महिन्यातील या चर्चासात्रासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या वाटचालीत ओमप्रकाश देशमुख याचा सहयोग हा विषय घेण्यात आला होता. चर्चासत्रातील उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील काळात दिव्यांग विकासाच्या कामात कार्यरत राहण्याची विनंती केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कान्हेकर यांनी केले. सूत्रसंचलन हरिदास शिंदे यांनी तर रमेश मुसूडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले
